महाराष्ट्र राज्याने विविध क्षेत्रात विकासाची घोडदौड सुरु ठेवली आहे. राज्यातील शहरी व ग्रामीण भागाच्या विकासाचा समतोल साधन्यासही यात प्राधान्य आहे. महाराष्ट्राचा औद्योगिक त्रिकोण, पुणे येथे आयटी क्षेत्राची भरभराट तसेच कोकण, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील औद्योगिक विकासातून त्या-त्या भागातील उद्योगाला चालना देण्याचे कार्यही जोमाने सुरु आहे. नवे आव्हान व नव्या संधी यांची सांगड घालत नव्या युगाच्या अपेक्षांना पूर्ण करुन विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने महाराष्ट्रानेही आपली जबाबदारी स्वीकारली आहे. याचदिशेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अग्रेसर होत नागपूरसह विदर्भाला प्रगती पथावर घेऊन जाण्यासाठी ‘नवीन नागपूर’ या महत्वाकांक्षी आंतरराष्ट्रीय व्यवसाय व वित्तीय केंद्र उभारणीच्या दिशेने नुकतेच महत्वाचे निर्णय व सामंजस्य करार झाले आहेत. या प्रकल्पाचे नामाभिदान दस्तूरखुद्द मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केले आणि त्यांच्याच अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत प्रकल्पास मंजुरी मिळाली आणि त्यांच्याच उपस्थितीत ६ हजार ५०० कोटींचा सामंजस्य करारही झाला. विदर्भासह महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर पुढे घेऊन जाण्यासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे.देशातील एक अत्याधुनिक आणि जागतिक पातळीवरील वित्तीय व व्यवसाय केंद्र बनण्याच्या दिशेने पडलेले हे एक निर्णायक पाऊल आहे.नागपूरच्या आर्थिक नकाशावर हा प्रकल्प “गेम चेंजर” ठरणार आहे.
भौगोलिकदृष्टया भारताचे हृदय अर्थात झिरो माईल्सचे शहर व मध्यभारतातील सर्वात मोठे, महाराष्ट्राची उपराजधानी, टायगर कॅपिटल, विदर्भाचे मुख्यालय आणि राज्यातील लोकसंख्येच्यादृष्टीने तिसऱ्या क्रमांकाचे शहर आदी बिरुदावल्यांसह गौरवशाली सामाजिक,आर्थिक,ऐतिहासिक, राजकीय व संस्कृतिक वारसा असणारे नागपूर शहर. आता समृद्धी महामार्गाचा झिरो माईल,मेट्रो ट्रेन,ग्रीन बसेस,उड्डानपुल,एलिवेटेड मार्ग,विमानतळ आणि रेल्वेसह सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा, महत्वाची प्रशासकीय कार्यालये,शैक्षणिक संस्थांनी हे शहर समृद्ध झाले आहे.देशातील पहिले प्रायोगिक तत्वावरील स्मार्ट व इंटेलिजंट गाव उभारण्याचा मानही नागपुरला नुकताच मिळाला आहे. याच कडीत शहराच्या विकासाला गती देत जागतिक दर्जाच्या सुविधांनी युक्त असे महत्वाचे व्यवसाय व वित्तीय केंद्र बनन्याच्या दिशेने ‘नवीन नागपूर’च्या रुपाने महत्वाचे पाऊल टाकले गेले आहे.